लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संवेदनशील वृत्ती असेल तर एखाद्याचे दुरावलेले कुटुंब परत मिळू शकते, याची प्रचिती जिल्ह्यातील पातूरच्या उमेश अमानकर यांच्या बांधीलकीतून दिसून आली आहे़ त्यांच्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असलेल्या ७८ वर्षीय रामबाबू मंगल यांची दक्षिण भारत भ्रमंती अखेर घरी येऊन थांबली़कल्याण येथील मंगल परिवार आग्रा ते हैद्राबाद रेल्वेने प्रवास करीत होता़ त्यांच्या समवेत घरातील ७८ वर्षीय रामबाबू मंगलही होते़ त्यांची स्मरणशक्ती कमजोर होती़ दरम्यान, २७ जून रोजी दुपारी २ वाजता भोपाळ रेल्वे स्टेशनवर रामबाबू उतरले़ घरच्यांना त्याची खबर नव्हती़ २८ जून रोजी भोपाळच्या रेल्वे स्टेशनवरील सीसी कॅमेरामध्ये ते दिसले़ त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही़ पुढे काय आणि कसे घडले, याची कोणालाही खबर नाही़; मात्र चार दिवसांनंतर रामबाबू थेट अकोला जिल्ह्यातील पातूर गावी पोहोचले़ तेथे ते एका रिक्षात बसले़ त्यांनी माझ्या मुलीचे कृषी सेवा केंद्र आहे, तेथे नेऊन सोडा, असे सांगितले़ रिक्षा चालकाने अख्खे पातूर दाखविले. त्यांनी कृषी सेवा केंद्र ओळखले नाही़ शेवटी रिक्षाचालक उमेश अमानकर यांना ओळखत होता़ त्यांचे रेणुका सेवा केंद्र आहे़ तिथे पोेहोचल्यावर रामबाबूंनी हेच माझ्या मुलीचे कृषी सेवा केंद्र आहे, असे सांगितले़ त्यावेळी अमानकर रिक्षाजवळ आले़ त्यांनी रामबाबूंना पाहिले; परंतु ते नातेवाईक नाहीत, याची खात्री पटली़ त्यांनी विचारपूस केली़ तुम्हाला कोठे जायचे आहे़ ते म्हणाले मी हैद्राबादमध्ये आलो आहे़ हे माझ्या मुलीचे दुकान आहे़ आधी मला घरी सोडा़ पुन्हा मी दुकानात येतो़ त्यांच्या संवादावरून अमानकर यांना त्यांच्या स्मरणशक्तीविषयी जाणीव झाली़ त्यांनी त्यांच्या खिशातून अलगदपणे ओळखपत्र व डायरी काढली़ त्या डायरीवरून संपर्क साधला़ तेव्हा मंगल परिवारातील सदस्यांनी रामबाबूंना तेथेच सांभाळावे़ काही तासात अकोल्यातील त्यांचे परिचीत येतील, हे सांगितले़; मात्र रामबाबू रिक्षाच्या खाली उतरत नव्हते़ त्यामुळे उमेश यांनी रामबाबूंना घरी पाठवतो, असे सांगून अक्षरश: दोन अडीच तास रिक्षातून फिरवत गुंतवून ठेवले़; दरम्यान हैद्राबाद मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकावर पोलिसांनी तपासणी केली होती़ नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनीही त्या मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना संपर्क केला होता़ तद्नंतर त्यांनी अमानकर यांच्याशी संवाद साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले़ शेवटी ओळख पटल्यानंतर उमेश अमानकर यांनी रामबाबूंना मंगल परिवाराच्या स्वाधीन केले़ नांदेडचे पोलीस करणार अमानकरांचा गौरव नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनीही या तपास मोहिमेत मंगल परिवाराला सहकार्य केले़ ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील उमेश अमानकर यांच्या सतर्कतेमुळे रामबाबूसारखे स्मरणशक्ती कमजोर असलेले व्यक्ती कुटुंबियांना परत मिळू शकले़ हीच सामाजिक जाणीव ठेवली तर अनेक कुटुंबातील दुरावलेले सदस्य आपापल्या घरी पोहोचू शकतात़ आम्ही पोलीस दलाच्यावतीने अमानकर यांना सन्मानित करणार आहोत़
कल्याणच्या रामबाबूंना पातूरच्या उमेशने दिला आधार!
By admin | Published: July 05, 2017 1:02 AM