अकोला : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम पोळ्यासाठी साज तयार करण्यावरही झाला आहे. साज तयार करणाऱ्यांनी यंदा केवळ ५० ते ५५ टक्केच साज तयार केले गेले आहेत. त्यामुळे यंदा बैलांचे साज महागले आहे; मात्र पोळ्याची उत्सुकता असलेल्या शेतकऱ्यांची साज खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे. कोरोना संसर्ग बऱ्यापैकी निवळला असतानाही राज्यात आतादेखील सण, उत्सवांना परवानगी नाही. त्यामुळे यावर्षीही बैलांचा पोळा सण, सार्वजनिकरीत्या साजरा करता येणार की नाही, याबाबत शेतकरी वर्ग संभ्रमात आहे. पोळा हा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे; परंतु अद्यापही याबाबत प्रशासनाकडून कोणत्याच सूचना नाहीत. गतवर्षी पोळा सणाच्या आठ दिवसांआधीच प्रशासनाच्या सूचनेवरून ग्रामपंचायतीकडून गावात मुनादी देऊन सार्वजनिक पोळा न भरविण्याची सूचना देण्यात आली होती. शहरातील बाजार पोळ्यानिमित्त बैलांसाठी लागणाऱ्या साज-सिंगाराने सजला आहे; परंतु पोळ्याचा सार्वजनिक सण साजरा होण्याबाबत शेतकरी साशंक आहेत. तरीही बहुतांश शेतकरी बैलांच्या साज-शिंगाराचे साहित्य खरेदी करीत आहे.
बैलाच्या साजाचे भाव (जोडीत)
आधी आता
वेसन ५० ६०
घुंगरू १३०० १५००
चामडी पट्टे २७० ३००
म्होरके १३० १५०
दोर १३० १५०
गळ्यातील गेठा ११० १२०
गोंडे ४५ ५०
कुवळ्याचा हार २६० ३००
या मालाची कमतरता
कोरोना काळात पोळा भरणार की नाही, याबाबत शाश्वती नसल्याने जिल्ह्यातील काही कारागिरांनी माल कमी प्रमाणात तयार केला. त्यामुळे साजासाठी लागणारे तागाचे गोंड, गळ्यातील गेठा, घुंगरू, आदी साहित्याची कमतरता भासत आहे.
साज विक्रेते म्हणतात...
कोरोनामुळे यंदाही पोळा होणार की नाही, याबाबत माहिती नाही. त्यामुळे शेतकरी कमी प्रमाणात साज खरेदी करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत गर्दी राहील.
- राजू पजई
पोळा सण जवळ आल्याने शेतकरी साज खरेदीसाठी गर्दी करीत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा काही प्रमाणात खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. यंदा साजही महागला आहे.
- मोतीलाल कुरई
कोरोनाचे सावट पाहता यंदा साजाची कमी विक्री होण्याची शक्यता आहे. पोळा जवळ आल्याने शेतकरी येत आहेत. चार दिवसांत आणखी किती विक्री होते यावर अवलंबून आहे.
- बद्रुद्दीन मोहम्मद
यावर्षी साज बऱ्यापैकी बनविला आहे. दोन दिवसांपासून थोडी फार गर्दी आहे. कोरोनाची भीती असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. साजच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
- नाना पजई
...अन्यथा घरीच पूजन
यावर्षीही पोळा भरणार नसल्याची भीती आहे. त्यामुळे परवानगी आली तर सार्वजनिक पोळ्यात सहभाग घेऊ, अन्यथा घरीच बैलांचे पूजन, ओवाळणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.