लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट वन्य जीव विभागांतर्गत सोनाळा बिटमध्ये मृत वाघाचे शवविच्छेदन करून विल्हेवाट लावण्यासाठी गेलेले वन विभागाचे अधिकारी व संबंधित डॉक्टरांवर १७ जुलै रोजी मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.अकोट वन्य जीव विभागांतर्गत सोनाळा वन परिक्षेत्रात दीड वर्षांच्या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वन्य जीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सदर वाघाचा पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन व त्याची विल्हेवाट जागेवरच करण्यात आली. कुजलेल्या वाघाचे मांस जाळण्यात आले. या धुरामुळे बाजूच्या झाडावरील मधमाशा उठल्या आणि त्यांनी उपस्थित वन कर्मचारी, अधिकारी व डॉक्टरांवर हल्ला चढविला. यातील पाच जण मधमाशांच्या तावडीत सापडले. मधमाशांच्या हल्ल्यातील जखमींना नजीकच्या धूळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. या सर्वांची प्रकृ ती सध्या उत्तम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:46 AM