अकोला: सणासुदीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, आगामी दसरा सणापूर्वी अकोला स्थानकावरून पुणे, मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल असून, प्रतीक्षा यादी मोठी असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
हावडा-मुंबई या देशातील प्रमुख लोहमार्गावर असलेले अकोला रेल्वे स्थानक हे जंक्शन स्थानक आहे. देशातील विविध भागात जाण्यासाठी येथून गाड्या उपलब्ध आहेत. मध्य व दक्षिण- मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांचे दररोज अकोला स्थानकावरून आवागमन सुरू असते. नवरात्र व आगामी दसरा सणामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने स्थानकावर गर्दी होत आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटासाठी १२० दिवस आधी आरक्षण करण्याची मुभा असल्याने अनेकांनी आगामी सणासुदीच्या दिवसांकरिता आरक्षण करून ठेवले आहे.
दसरा जवळ आल्याने यामध्ये आणखी भर पडली असून, मुंबई व पुण्यासह बहुतांश सर्वच मार्गावरील गाड्यांचे द्वितीय शयनयान श्रेणीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. परिणामी, वेळेवर तिकीट काढणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागत आहे. प्रवासाच्या दिवसापर्यंतही तिकीट कन्फर्म होण्याची चिन्हे नसल्याने अनेकांना नाइलाजाने इतर पर्याय शोधावे लागणार आहेत.
कोणत्या गाड्यांना किती वेटिंग?
- गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस : ९९
- अमरावती- मुंबई एक्स्प्रेस : १२१
- हावडा- मुंबई गितांजली एक्स्प्रेस : ७०
- गोंदीया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस : ५९
- नागपूर- पुणे गरीबरथ : १२५
- हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस : ६३