राजेश शेगाेकार
अकोला : आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा हे वाचक असलेल्या श्री स्वामी समर्थ शिवमहापुराण कथा महोत्सवास शुक्रवारी सकाळी वाशीम मार्गावरील म्हैसपूर येथे उभारण्यात आलेल्या विशाल कथास्थळी प्रारंभ झाला. ११ मे पर्यंत दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत होणार असलेल्या शिवमहापुराण कथेतून शिवभक्ती अनुभवण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखाे संख्येने भाविक कथास्थळी दाखल झाल्याने म्हैसपुरात शिवभक्तीचा महापूर आल्याचे चित्र दिसून आले.
या कथा महोत्सवासाठी सुरक्षा व व्यवस्थेसाठी प्रशासनही सरसावले असून प्रशासनाच्यावतीने डॉक्टरांसह आरोग्य पथक, चार रुग्णवाहिका, अग्निशमन बंब आदी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन दलाची दोन पथके कथास्थळी तैनात असून, आयोजक आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी मध्यवर्ती कक्ष कार्यान्वित केला आहे. कथास्थळी बुधवारपासूनच भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत देशभरातून हजारो भाविक कथास्थळी दाखल झाले. शुक्रवारी कथा सुरू हाेण्याच्या प्रारंभीच सकाळी दाेन्ही सभामंडप भक्तांच्या गर्दीने फुलून गेले हाेते. आगामी दिवसात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.