अकोला : महाराष्ट्र-तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ च्या अकोला महान मार्गांच्या डांबरीकरणास लवकरच सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अकोला, बार्शीटाकळी, महान मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. अकोला-महान २९ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे डांबरीकरण लवकरच सुरू होत आहे. पावसाची रिपरिप संपताच डांबरीकरणास सुरुवात होईल, असेही सूत्रांनी सांगितले.अकोला-महान मार्गाची दुर्दशा झाली असून, या मार्गांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने होत होती. अकोला-वाशिम जिल्ह्यास जोडणाºया या मार्गाच्या डांबरीकरणास ३१.५५ रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत या मार्गाचे डांबरीकरण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात आणि राज्यमंत्री संजय धोत्रे व जिल्ह्यातील आमदारांच्या मार्गदर्शनात या मार्गाचे निर्माण होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.