अकोला : राज्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य सरकारकडून पुरविण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीचे शिल्लक असलेले डोस आता ४५ पेक्षा अधिक वयोगट असलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे. मंगळवार, ११ मेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतरिक्त संचालक आरोग्य सेवाच्या डॉ, अर्चना पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
राज्यात १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यांना ४ लाख ७९ हजार १५० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत. सध्या राज्यात कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देय असलेल्या ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. या वयोगटातील नागरिकांना लसीचा पुरवठा हा केंद्र सरकारकडून केला जातो. दुसरा डोस देय असलेल्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निधीमधून जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या ४ लाख ७९ हजार १५० डोसपैकी काही डोस जिल्ह्यांकडे उपलब्ध आहेत. या शिल्लक असलेल्या लसीचा वापर त्या त्या जिल्ह्यांतील कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देय असलेल्या नागरिकांसाठी करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या पुरवठा करण्यात आलेल्या व शिल्लक असलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा वापर कोणत्याही गटातील पहिल्या डोससाठी करण्यात येऊ नये. याची अंमलबजावणी ११ मेपासूनच करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. यामुळे बरेच दिवसांपासून दुसरा डोस रखडलेल्यांना आता लवकरच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.