पातूर : पातूर पंचायत समितीअंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामाचा गलथान कारभार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या योजनेसाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी पातूरच्या पंचायत समिती कार्यालयात चकरा मारीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या विभागात भोंगळ कारभार सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटी परिचालक संतोष इंगळे या युवकाच्या भरवशावर सुरू आहे. तालुक्यातील जनतेला घरकुल, शेळी गोठा, कुक्कुटपालन, शौचालय, विहीर पुनर्भरण, सिंचन विहीर, आदी कामे एका कंत्राटी परिचालकाच्या भरवशावर करण्यात येत आहेत. या विभागात कार्यरत असलेले साहाय्यक कार्यक्रमाधिकारी यांना कामाचा अनुभव नसल्याने या कंत्राटी परिचालकाच्या भरवशावर कारभार सुरू असल्याने लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.