अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा जिल्ह्यातील शेकडो दुकानांमध्ये आॅक्टोबर महिन्यात फज्जा उडाला आहे. ठरलेल्या तारखेला दुकानांत धान्यच पोहोचले नसल्याने लाभार्थींना वेळेत वाटप झाले नाही. या प्रकारामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर ही बाब गेल्याचे स्पष्ट होत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थींना धान्य वाटपासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. त्या कायद्यानुसार लाभार्थींना ठरलेले प्रमाण आणि वेळेतच धान्याचा पुरवठा करण्याचा उपक्रमही सुरू झाला. त्यासाठी शासनाने गोदामातून धान्य उचल करणे, दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी पासिंगचा कालावधी, चलानद्वारे धान्याची रक्कम बँकेत भरणे, द्वारपोच योजनेतून धान्य दुकानांत पोहोचविणे, या सर्व प्रक्रियांसाठी महिन्यातील दिवस ठरवून दिले आहेत. त्या वेळापत्रकानुसार पुरवठा विभागाने प्रक्रिया केल्यास प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला जिल्ह्यातील सर्वच दुकानांमध्ये धान्य उपलब्ध होऊ शकते. ती पुरवठा विभागाची जबाबदारी आहे; मात्र गेल्या काही महिन्यांत पुरवठा विभागाच्या यंत्रणेकडून त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातून अन्न सुरक्षा कायद्यानुसार ठरलेल्या अन्न सुरक्षा दिनाचा फज्जा उडविला जात आहे. त्यातच दुकानांत धान्य उशिरा पोहोचल्याने लाभार्थी येऊन परत जातात. त्यातून त्यांच्या हिश्श्याच्या धान्याचा काळाबाजार करण्यास प्रोत्साहन देण्याचाही प्रकार घडत आहे. चालू महिन्यातील नियोजनानुसार दरदिवशी धान्य वाटपाचे प्रमाण पाहता तहसील स्तरावरील यंत्रणा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे.- अकोला, मूर्तिजापुरातील लाभार्थी प्रतीक्षेत!अन्न सुरक्षा दिवसाचा फज्जा अकोला शहर, ग्रामीण आणि मूर्तिजापूर तालुक्यात उडाला आहे. ८ आॅक्टोबरपर्यंत अकोला शहरातील १२४ पैकी धान्य पासिंग झालेल्या ८१ पैकी ७९ दुकानात धान्य पोहोचले. अकोला ग्रामीणमध्ये १७३ पैकी १३७ दुकानांच्या धान्याचे परमिट पासिंग झाले. त्यातील ११९ दुकानांतच धान्य पोहोचले. धान्य वाटपाचे हे प्रमाण पाहता शहर आणि ग्रामीणमध्ये अनुक्रमे ३७ व ३२ टक्के दुकानांत धान्यच पोहोचले नसल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातही घडला आहे.- जिल्ह्यातील हमालांवर उपासमारीची वेळतहसीलच्या शासकीय गोदामात धान्याची चढ-उतार, प्रमाणीकरण करणाºया हमालांना गेल्या आॅगस्टपासून मजुरीही मिळाली नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात चकरा मारल्या; मात्र काहीच उपयोग झाला नाही. मजुरी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.गोदामातील हमाल कामगारांनी मजुरीच्या समस्येसंदर्भात काहीही सांगितले नाही. इंडेंट पासिंग झालेल्या दुकानदारांना धान्य वाटप झाले आहे. पासिंगनंतरही धान्य न मिळालेल्या दुकानांची माहिती दिल्यास दुकानदारांना त्याबाबत विचारणा केली जाईल.- राजेश खवले, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी.