अकोला: समाजकल्याण विभागाच्या अनुदानातून राबवल्या जाणाºया दूधपूर्णा योजनेतील लाभार्थींना ठरावीक बाजारातूनच म्हैस खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे त्या बाजारातील पुरवठादारांनी म्हशीच्या किमती वाढवून लाभार्थींना विकणे सुरू केले आहे. या प्रकाराने व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे तर त्याच वेळी लाभार्थींना १० ते १५ हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत. हा प्रकार तातडीने थांबवून व्यापाºयांच्या तावडीतून सुटण्यासाठी बाजाराची सक्ती करू नये, या मागणीसाठी लाभार्थींना गुरुवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या उपकरातील गेल्या २००८ पासून अखर्चित निधीतून दुधपूर्णा योजना राबवण्यात येत आहे. ६ कोटी रुपये त्यासाठी खर्च होत आहेत. ५२१ लाभार्थींना दोन दुधाळ जनावरे दिली जात आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या निर्देशानुसार दुधाळ जनावरे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच.आर. मिश्रा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हाबाहेरच्या बाजारातून म्हशी खरेदी कराव्या लागतात. त्यासाठी बडनेराचा बाजारच निश्चित झाला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हशीची खरेदी होणार असल्याने बाजारातील व्यापाºयांनी चांगलाच फायदा उठवला. म्हशीमागे १५ ते २० हजार रुपयांनी भाव वाढवले. इतर बाजारातील तुलनेत ही किंमत अधिक असल्याने लाभार्थी पुरते नागवले जात आहेत. त्या व्यापाºयाची रक्कम जिल्हा परिषदेकडून दिले जात आहे. त्यामुळे या बाजारातून खरेदी करण्याची सक्ती का केली जाते, याबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाभार्थींना पसंत असलेल्या कोणत्याही बाजारातून म्हशी खरेदी करण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील लाभार्थींनी गुरुवारी थेट जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच.आर. मिश्रा यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये काही तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.