अकोला: दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत ९५ लाभार्थींची निवड करण्यास जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागासवर्गीय लाभार्थीना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत प्राप्त अर्जांमधून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी ९५ लाभार्थींची निवड करण्याच्या विषयाला समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती व नवबाैध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावरून प्राप्त प्रस्तावांनुसार कामांचे स्वरूप आणि वस्तीच्या बदलास सभेत मंजुरी देण्यात आली. समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्तालाही सभेत मंजूर करण्यात आली. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला समितीचे सदस्य गजानन डाफे, प्रशांत अढाऊ, संदीप सरदार, कोमल पेटे, सुमन गावंडे, माया नाईक, नीता गवई, आम्रपाली खंडारे, वंदना झळके, दीपमाला दमाधर, प्रकाश वाहुरवाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पंचायत समितीनिहाय निधी निश्चितीचा विषय पुढील सभेत!
समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जाती व नवबाैध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासकामांसाठी प्राप्त निधीतून जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय निधी निश्चित करण्याचा विषय समितीच्या पुढील सभेत घेण्याचे या सभेत ठरविण्यात आले.