अकोला : जिल्ह्यात कोविड लसीकरण माेहिमेला सुरुवात होऊन दाेन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, पहिल्या टप्प्यातील लाभार्थींना लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत. अशा लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे, परंतु अनेक लाभार्थी ते टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत केवळ ४०.७० टक्के वैद्यकीय कर्मचारी, तर ३७.४९ टक्के फ्रंटलाइन वर्करनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ९४.२५ टक्के लसीकरण आटोपले आहे. यातील बहुतांश लाभार्थींना लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवसांचा कार्यकाळ जवळपास पूर्ण झाला असून लाभार्थींनी दुसरा डोस घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणात ९ हजार ४१२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देणे अपेक्षित होते, त्यापैकी ९ हजार ३३९ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस केवळ ३ हजार ८३१ लाभार्थींनी घेतला. एकूण लाभार्थींच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ४०.७० टक्के आहे. हीच स्थिती फ्रंटलाइन वर्करच्या बाबतीत असून, ८ हजार ४१४ लाभार्थींपैकी केवळ ७ हजार ४६२ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला होता, तर लसीचा दुसरा डोस केवळ ३ हजार १५४ म्हणजेच केवळ ३७.४९ टक्के लाभार्थींनी घेतला आहे. हे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी असल्याने लाभार्थींमध्ये दुसऱ्या डोसच्या बाबतीत निरुत्साह दिसून येत आहे.
किमान २८ दिवसांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित
कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लाभार्थींनी किमान २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. असे असले, तरी २८ दिवस झाल्यानंतर किती दिवसांच्या आत दुसरा डोस घ्यावा, याबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
२५ हजारांवर वृद्धांनी घेतली लस
कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील २५ हजार २५८ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला. हे प्रमाण इतर घटकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या ४५ वर्षांवरील ५ हजार २२४ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.