अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध ११ योजनांतर्गत २ हजार २५९ लाभार्थींच्या याद्यांना गुरुवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत वाहन चालक प्रशिक्षण, पिको मशीन, प्लास्टिक ताडपत्री, शिलाई मशीन, डिझेल पंप, बियाणे वाटप, टिनपत्रे वाटप, मंडप व लाऊडस्पिकर, दिव्यांगाना उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत अंतर्गत मिर्ची कांडण यंत्र, दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल व दिव्यांगांनी दिव्यांगांशी विवाह योजना इत्यादी ११ योजनांतर्गत ८ हजार १९५ लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून निवड करण्यात आलेल्या २ हजार २५९ लाभार्थींच्या याद्यांना जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’व्दारे घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य गजानन डाफे, प्रशांत अढाऊ, नीता गवई, आम्रपाली खंडारे, दीपमाला दामधर, कोमल पेटे, सुमन गावंडे, माया नाईक, वंदना झळके, बार्शीटाकळी पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, समाजकल्याण अधिकारी आर.एस. वसतकार यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
दुघाळ जनावरे वाटप योजना;
लाभार्थींची निवड लांबणीवर!
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तांत्रिक मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत लाभार्थींची निवड समाजकल्याण समितीच्या सभेत होऊ शकली नाही. त्यानुषंगाने लाभार्थींची निवड करण्यासाठी विशेष सभा बाेलविण्याची मागणी सदस्यांनी सभेत केली.