अकोला : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील ४४ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी सोमवार, ७ जून रोजी दिला. यासोबत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील १२६ कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजनेची प्रलंबित प्रकरणेदेखील लवकरच जिल्हा परिषद प्रशासनामार्फत निकाली काढण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी सेवेची दहा, वीस आणि तीस वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ लागू करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ लागू केली जाते. त्यानुषंगाने या योजनेंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील ४४ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. त्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी संवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील १२६ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याची प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येणार असून, पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.