अकोला: अपात्र असताना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा घेऊन लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांविरुध्द पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाइ जिल्हा पुरवठा विभागामार्फत केली जात आहे. त्यामध्ये १९ जूनपर्यंत जिल्ह्यात ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी सोमवारी दिली.
स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर मिळणारा अन्न धान्याचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून शासनामार्फत ‘गिव्ह इट अप’, ही योजना राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्हयातील अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून स्वस्त धान्य वाटपाच्या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. स्वत:हून स्वस्त धान्याचा लाभ सोडण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत गेल्या २५ फेब्रुवारीपर्यंत होती. तथापि, त्यानंतर अपात्र असूनही स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध पोलीसांत गुन्हे दाखल करण्याची कारवाइ जिल्हा पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये १९ जूनपर्यंत जिल्हयात ६५ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची कारवाइ करण्यात आली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हयात ११ हजार अपात्र लाभार्थी !
जिल्ह्यातील गावपातळीवरील दक्षता समित्यांच्या अहवालानुसार प्राधान्य गट योजनेतील ६हजार १४८, अंत्योदय अन्न योजनेतील ३०४ आणि दारिद्र्य रेषेवरील १ हजार २९७ असे एकूण ९ हजार ४३ लाभार्थी स्वस्त धान्याच्या लाभासाठी अपात्र असल्याचे कळविले आहे. तसेच प्राधान्य गट योजनेतील १ हजार ५८४, अंत्योदय अन्न योजनेतील ७४ आणि दारिद्र्यरेषेवरील ३०५ अशा एकूण १हजार ९८१ जणांनी स्वतःहून स्वस्त धान्याच्या लाभासाठी अपात्र असल्याचे अर्ज दिले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ हजार २४ लाभार्थी अपात्र असल्याचे निदर्शनास आले आहे.
अपात्र लाभार्थ्यांविरुध्द तालुकानिहाय दाखल गुन्हे
तालुका लाभार्थीबार्शिटाकळी २५
तेल्हारा १७अकोला शहर ०८
अकोट ०५बाळापूर ०७
पातूर ०३
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हयातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्या आणि नगरपालिकांकडून प्राप्त अहवालानुसार अपात्र असताना स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्यांविरुध्द पोलीसांत गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत जिल्हयात ६५ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बी.यू.काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी