अकोला : सडक्या आणि टाकाऊ कडधान्यापासून तयार होणारी फरसान पावडर बेसनाच्या नावाखाली सर्रास विकल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशीत करताच खळबळ माजली. या वृत्ताची गंभीर दखल घेत अकोल्यातील उद्योजक आणि हजारो किराणा दुकानदारांनी, बेसन म्हणून आम्ही फरसान पावडर विकत नाही, बेसन वेगळे अन् फरसान पावडर वेगळे-वेगळे विकतो,अशी बचावात्मक आणि सावध भूमिका घेतली आहे.फरसान पावडरबाबत अधिक माहिती काढली असता, ३० रुपये प्रतिकिलोच्या दरानेही ही पावडर हॉटेल व्यावसायिकांना विकल्या जात असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले. चण्याची डाळ महाग असताना बेसनाचे भाव कमी कसे, याचा मागोवा घेतला असता, हे घबाड समोर आले. अकोला औद्योगिक वसाहतीत १५ बेसन उत्पादक उद्योग असून, बहुतांश उद्योजक फरसान पावडरची निर्मिती करतात. अकोल्यातील स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे बेसन देशभरात पाठविले जाते. हरभरा, वाटाणा, मटकी, तांदूळ, मका आणि लाख डाळीसह कडधान्याच्या सडक्या चुरीपासून फरसान पावडर तयार केले जाते. त्याला हळद आणि इतर कृत्रिम रंग देऊन त्याची विक्री केल्या जात असल्याचे लोकमतने उजेडात आणल्याने नागरिकांमध्ये उद्योजक, किराणा दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.स्वस्त मिळण्याचे कारण काय?महागडी डाळ आणि बेसनाच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी दराने अकोल्यातील फरसान पावडर देशभरात विकले जाते. एवढ्या कमी आणि स्वस्त दरात ही विक्री कशी होते, अशी विचारणा उद्योजक, किराणा व्यावसायी, हॉटेलचालक आणि अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांना केली असता, त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही.फरसान पावडर आणि बेसन वेगवेगळे आहे. फरसान पावडरला भेसळयुक्त म्हणता येणार नाही. विविध घटकांपासून फरसान पावडर नियमानुसार तयार करण्यास मान्यता आहे; मात्र बेसन म्हणून फरसान पावडर विकता येत नाही. तसे कुणी करीत असेल, तक्रार असेल तर कारवाई करता येईल. फरसान पावडर आणि बेसनाचे नमुने दरमहा तपासले जातात. त्यात अजून तरी भेसळ आढळलेली नाही.-नितीन नवलकार, निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन, अकोला.
बेसन उद्योजकांची बचावात्मक सावध भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 1:52 AM