अकोला: सिद्धी गणेश प्रॉडक्शनद्वारे मंगळवारी येथे घेण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धेत अमरावती येथील श्री वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्थेच्या ‘जिगरी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. आश्रय प्रॉडक्शन, अमरावतीच्या ‘अनुरागम’ला द्वितीय, तर नागपूर येथील सी.पी. बेरार महाविद्यालयाच्या ‘अनोळखी ओळख’ या एकांकिने तृतीय क्रमांक पटकावला.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली जोशी, परीक्षक व अभिनेता योगेश सोमन, दिग्दर्शक यतीन मांझिरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेअंतर्गत ११ एकांकिका सादर करण्यात आल्या. सायंकाळी माजी महापौर मदन भरगड, पीडीकेव्ही कौन्सिल सदस्य गोपी ठाकरे, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थोरात यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कारासह इतर वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजक सचिन गिरी यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल कुळकर्णी, उदय दाभाडे, अक्षय पिंपळकर, मयूर भालतिलक यांनी परिश्रम घेतले. अकोल्यातील नाट्यकर्मी मधू जाधव, अशोक ढेरे, बालचंद्र उखळकर, डॉ. सुनील गजरे, विष्णू निंबाळकर, अरविंद कुळकर्णी यांच्यासह रसिक प्रेक्षकांनी दिवसभर एकांकिकांचा लाभ घेतला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, डॉ. प्रा. संतोष हुशे यांनी सदिच्छा भेट दिली.