अकोला : मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठीचा सध्या सर्वोत्तम काळ असून, शासनाच्या ‘स्टँडअप’,‘मेक इन महाराष्टÑ’ ‘स्टार्टअप’ योजनेंतर्गत शेकडो मागासवर्गीयांनी उद्योग उभे केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.मागासवर्गीय उद्योजकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कांबळे येथे आले होते. याप्रसंगी एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागासवर्गीयांचे (अनुसूचित जाती-जमाती) उद्योग उभारण्यासाठी ‘डिक्की’ सरकारच्या धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावत असून, उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. एवढेच नव्हे, उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण केली असून, चार टक्के माल खरेदी करण्यासाठीचा कायदाच केल्याने २४ हजार कोटींची उत्पादने शासनाने खरेदी करणे अनिवार्य केले आहे. अनुसूचित जाती ,जमाती हब निर्माण केले. उद्योगांचे स्वरू प पाहून ५० लाख, ५० कोटींपर्यंतचे कर्ज उद्योग उभारण्यासाठी देण्यात येत आहे. देशात २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. या बँकांच्या १२५ शाखांमधून एका उद्योजकाला अर्थसाहाय्य केल्यास देशात १२५ नवे मागासवर्गीय उद्योजक निर्माण होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.राज्य शासनाने ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेंतर्गत प्रोत्साहन योजना सुरू केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक औद्योगिक वसाहतीतीत (एमआडीसी) २० प्लॉट राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. आतापर्यंत १५ औद्योगिक वसाहतीमध्ये १२० मागासवर्गीयांना प्लॉट देण्यात आले असून,१० लाख रू पये अनुदान आहे.तसेच उद्योग उभारण्यासाठी २५ टक्के भांडवली गुतणवूकीसाठी अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुद्रा योजनेंतर्गत १२ कोटी लोकांना ऋण देण्यात आले. सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग उभारण्यासाठी मागासवर्गीयांमध्ये क्षमता बांधणीचे काम करण्यात येत आहे. महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत तेल, गॅस वाहतूक व इतर कामे आता मागासवर्गींयाना मिळत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.
आता अकोल्यात पैठणीअकोल्यात पहिला पैठणी निर्मितीचा उद्योेग माधुरी गिरी यांनी सुरू केला असून, मिलिंद कांंबळे यांच्या हस्ते गुरुवार, ५ जुलै रोजी या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर त्यांनी मेळाव्याला संबोधित केले.