भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर
हे सुप्रसिद्ध गीत प्रत्येक नवी सुरुवात करताना अनेकांना आठवत असेल. २०२० ला निराेप देऊन २०२१ ची सुरुवात करतानाही आपल्या सर्वांच्या भावना अशाच असतील. मात्र सरते वर्ष आणि नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आता आपल्याला केवळ विसावून चालणार नाही, तर २०२० मधील काेराेनाने आपल्याला धडा दिला आहे ताे धडा या वळणावर आठवून आता चुकांची पुनरावृत्ती हाेणार नाही असा संकल्प करीत आपण सर्व नव्या वर्षात प्रवेश करण्यासाठी सज्ज झालो पाहिजे.
काेराेनामुळे आपली जीवनशैली बदलली. लाॅकडाऊनच्या काळात शिस्त आली. स्वच्छता, स्वावलंबन यांचा धडा मिळाला. पर्यावरण रक्षणाचे भान आले. आप्तस्वकीयांची काळजी, आराेग्य, पाेलीस आणि प्रशासनातील देवदूतांचे महत्त्व अधाेरेखित झाले. राेजगार कधीही जाऊ शकताे म्हणून हतबल न हाेता नव्या संधींचा वेध घेतला पाहिजे हा धडाही मिळाला. अनेकांनी ताे गिरवला. ज्यांना गिरवता आला नाही त्यांच्यासाठी मदतीचे हात उभे राहिले. आपले गाव, आपला माेहल्ला, माझे शहर, माझे कुटुंब आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मी याचे भान प्रत्येकाला आले. सार्वजनिक ठिकाणचा वावर नियमात झाला. अशा कितीतरी घटना घडल्या ज्यामुळे आपण भविष्यकाळात चांगले नियाेजन करू शकू हा विश्वास आला आहे. सरत्या वर्षात सामाजिक भान ठेवून जगण्याचा जाे धडा मिळाला ताेच धडा पुढच्या वर्षातही आम्ही गिरवला तर भविष्यातील चिंतेने, काळजीने आणि भूतकाळातील वाईट घटनांनी उद्याचे वर्तमान चांगलेच राहील ही आशा करू या. त्यामुळेच सरत्या वर्षातील घटनांचे एक सिंहावलाेकन तुमच्यासाठी.