अकोला : लॉकडाऊनमुळे शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शहरात उपाशी मरण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांनी पसंती दिल्याने एस. टी. बस व रेल्वेने कामगार गावी रवाना होत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावाकडे गेले होते. एवढेच नव्हे तर, त्यावेळी वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे दुहेरी संकट कामगारांसमोर होते. स्वत:जवळ असलेली सर्व जमा-पुंजी संपल्यामुळे शहरात दिवस काढणे कामगारांसाठी खूप कठीण होऊन बसले होते. अशा परिस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने त्यांनी आपले गाव गाठले. काहींनी तर चक्क पायीच गावाची वाट धरल्याचेही पाहायला मिळाले.
--बॉक्स--
पुणे मार्गावर सर्वाधिक गर्दी
जिल्ह्यातून पुणे, मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तेथे गेलेले कामगार जिल्ह्यात परतत आहेत. यामुळे या मार्गावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये अनेक परप्रांतीय मजूर आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने ते रेल्वेने आपल्या घरची वाट धरत आहेत. मध्यप्रदेशमधील काही कामगार रेल्वेने गावी निघाले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून नागपूर, औरंगाबाद येथे जाणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. यामुळे या मार्गावरही गर्दी दिसत आहे.
--कोट--
पुन्हा तीच परिस्थिती येऊ नये!
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाने आता वीकेंड लॉकडाऊन सुरू केले आहे. मागील वर्षासारखी अडचण येऊ नये, त्यामुळे आम्ही पुन्हा गावाकडेच परतत आहोत.
- नितीन तिवारी
--कोट--
उपाशी राहण्याची वेळ येईल!
शहरातील कडक निर्बंधांमुळे पुन्हा नोकरीवर संकट उभे राहिले आहे. अशातच लॉकडाऊन लागल्यास उपाशी राहण्याची वेळ येईल. त्यामुळे गावाकडे परत आलो आहे.
- अमित पाटील
--कोट--
व्यवसाय बंद
यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काम करत असलेला व्यवसाय बंद आहे. आणखी काही दिवस शहरात थांबल्यास अडचणी वाढतील. त्यामुळे गावी परत जात आहे.
- शुभम इंगळे