अकोला: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा फिवर सट्टाबाजारातही दिसून आला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यावर अकोला शहरात लाखो रूपयांची उलाढाल झाली. भारताचा डाव सुरू झाल्यावर सलामीवीर रोहित शर्मा, चौकार, षटकारांची आतषबाजी करीत असताना, सटोडियांनी भारतीय संघाला झुकते माप दिले होती. सुरूवातीला भारतीय संघावरील रेट हा १ रूपया २५ पैसे होता. नंतर मात्र, विकेट पडल्यानंतर भारताचा भाव सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत ७३ पैशांवर आला तर ऑस्ट्रेलिया संघावरील भाव ७५ पैसे झाला होता. सामना सुरू झाल्यावर सटोडियांनी भारतीय संघालाच विजयाचे दावेदार मानले होते.
त्यात ऑस्ट्रेलियाचा दर हा ६० पैसे एवढा कमी दिला होता. सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी डावाची सुरूवात केल्यानंतर षटकार, चौकार येत असल्याने, भारतीय संघावरील रेट १ रूपया २५ पैशांवर पोहोचला. शुभमन गिलची विकेट पडल्यानंतरही हा रेट कायम होता. पण रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर भारतीय संघावरील रेट कमी होत गेला. धावगतीही मंदावल्यावरही विराट कोहली खेळपट्टीवर असल्याने, १ रूपया १५ पैशांपर्यंत रेट कायम हाेता. त्यानंतर विराटची विकेट गेल्यानंतर हा रेट एकदम ७३ पैशांवर आला आणि ऑस्ट्रेलियाचा रेट वधारून ७५ पैशांवर गेला. त्यानंतर मात्र, विकेटामागून विकेट गेल्यामुळे भारतीय संघावरील सट्ट्याचा रेट ६० पैशांवर आला होता. अकोल्यातील सटोडिया ऑनलाइन पद्धतीने सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर खायवाडी करीत होते. खेळातील प्रत्येक चेंडूनुसार सट्ट्याचा रेट बदलत असताना दिसत होता. भारतीय संघाच्या डावाप्रमाणेच सट्टाबाजारही खाली-वर होताना दिसत होता. परंतु काहींनी भारतीय संघाची आशा सोडलेली नाही. त्यांना भारत विजयी होईल. अशी आस आहे आणि सट्ट्याचा रेट एकदम उसळी घेईल. या विश्वासावर अनेकजण ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती आहे.
कशी होते खायवाडी...विश्वचषक क्रिकेटच्या भारत व ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या अंतिम सामन्यावर लाखो रूपयांचा ऑनलाइन सट्टा लावला जात आहे. यासाठी अनेक बुकी, सटोडिये सक्रिय होतात. क्रिकेट सट्ट्यातील एका जाणकाराने याबाबत माहिती दिली की, ५.३० वाजेपर्यंत भारतीय संघाचा रेट हा ७३ पैसे तर ऑस्ट्रेलिया संघाचा रेट ७५ पैसे आहे. यात चढउतार होऊ शकतो. एखाद्याने भारतीय संघावर ७३ पैशांनी एक लाख किंवा १० हजार रूपये लावले आणि भारत स्पर्धेत विजयी ठरला तर त्याला १ लाखावर ७३ हजार रूपये आणि १० हजारावर ७ हजार ३०० रूपये मिळू शकतात. हरला तर त्याचे नुकसान होऊ शकते. हीच बाब ऑस्ट्रेलिया संघावरील सट्ट्याच्या बाबतीतही लागू पडत असल्याचे त्या जाणकाराने सांगितले.