पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आजारांचा सर्वाधिक धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी स्वच्छ असणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यातील सुमारे १५४ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. जून महिन्यात प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील सुमारे ७७९ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १५४ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. शिवाय, जिल्ह्यातील बहुतांश भाग हा खारपाणपट्ट्यातील असल्याने येथील पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे. क्षारयुक्त पाणी पिण्यायोग्य नसल्यानेही अनेकांना पोटाशी निगडित विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्यास हेच पाणी आजाराचे प्रमुख कारण ठरू शकते.
तालुकानिहाय दूषित पाणी नमुने
तालुका - घेतलेले नमुने - दूषित नमुने
अकोला - ११३ - २१
बार्शिटाकळी - ११९ - १९
अकोट - १४८ - २७
तेल्हारा - १०० - ११
बाळापूर - ७८ - १
पातूर - १२४ - ३७
मूर्तिजापूर - ९७ - ३८
७७९- गावांतील नमुने घेतले तपासणीसाठी
१५४ - गावांतील नमुने आढळले दूषित
शहरी भागात ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
३५२- ठिकाणचे नमुने घेतले
१ - नमुने दूषित आढळले
३५१- नमुने चांगले आढळले
शहरी भागात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे नाल्यातील पाणी जलवाहिनीमार्गे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो.
शहरातील अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा प्रकार जलजन्य आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.
ज्या गावांत तपासणी झालीच नाही त्यांचे काय?
ज्या गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले, त्याच गावातील पिण्याच्या पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने अद्यापही तपासण्यात आले नाहीत. त्यामुळे अशा गावातील पिण्याचे पाणी किती शुद्ध असेल, याचा अंदाजा लावणेही कठीण आहे.
अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापरदेखील केला जात नाही. त्यामुळे अशा गावांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दूषित आणि क्षारयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अनेकांच्या किडणीवर परिणाम झाल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. किडनी व्यतिरिक्त पाेटाशी निगडित इतरही समस्या ग्रामस्थांना उद्भवत आहेत.
या गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर नाहीच
अकोला तालुक्यातील शिवर, शिवणी, मलकापूर, कानशिवणी, येडवण, सोनाळा, खडकी, शिवापूर, हिंगणा, जूना हिंगणा रोड, अकोली बु., सोमठाणा, अमानतपूर, ताकोडा, दुधाळा, मडाळा, बादलापूर या गावांमध्ये ब्लिचिंगपावडरचा वापरच होत नसल्याची माहिती आहे. तसेच बाळापूर तालुक्यातील तामशी, तांदळी, पिंपळगाव, बारलिंगा, मांडवा, कुपटा, खामखेड, धनेगाव, सांगवी या गावांसह मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर, सांजापूर, बिरवाडा, टिपटाळा आदि गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नाही.
आजारी पडायचे नसेल, तर पाणी उकळून प्या!
पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आजारी पडायचे नसले, तर पाणी उकळून प्या, असा सल्ला डॉक्टर देतात.
उकळून पाणी पिल्याने पोटाशी निगडित आजारांपासून सहज बचाव करणे शक्य आहे.
तसेच साठवून ठेवलेल्या पिण्याच्या पाण्यात क्लोरिनचा उपयोग देखील करू शकता.