जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
मण्यार : या सापाचा विषदंत लांबी फार लहान असते. त्याचे विष नागाच्या विषापेक्षा तीव्र व जहाल असते. या सापाचा निळसर काळा रंग, त्यावर पांढरे आडवे पट्टे शेपटीपासून सुरू होतात व डोक्याकडे ठिपके होत येतात. हा खूपच शांत स्वभावाचा साप आहे. मण्यार सापाचे विष मज्जातंतूवर परिणाम करते.
घोणस : या सापावर पिवळसर तपकिरी रंगावर गोल काळ्या ठिपक्यांच्या तीन रांगा असतात. शरीराने अजगराप्रमाणे जाडजूड, सुमारे चार ते पाच फुट लांब असतो. हा ३० ते ४० पिलांना जन्म देतो. चिडल्यास कुकरच्या शिटीप्रमाणे मोठ्याने आवाज काढतो. या सापाचे विषदंत लांब असतात. सर्पदंश झालेल्या जागी तीव्र वेदना सुरू होऊन दंशाभोवतालचा भाग सुजू लागतो.
नाग : नागाला ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असू शकतो. गव्हाळी फिकट, काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात.
फुरसे : फुरसे एक ते दीड फुटांपर्यंत लांबी असलेला साप आहे. यांचा रंग गडद तपकिरी असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. हा चिडल्यावर शरीराचा आकार एस प्रमाणे करून विशिष्ट प्रकारचा आवाज करतो. याचे विषदंत फार लांब असतात. त्याच्या विषात रक्ताच्या गाठी करण्याची क्षमता असून विष फार घातक आहे.
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
जिल्ह्यामध्ये घातक विषारी सापांसोबत काही बिनविषारी साप आढळतात. यामध्ये चित्रक, कवड्या, धामण, दिवड, गवत्या, डुरक्या घोणस, मांडोळ व अजगर यासारख्या सापांचा वावर आहे.
साप चावला तर...
सर्पदंश झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. ज्याला साप चावला, त्याला मानसिक आधार द्यावा.
रुग्णाला श्रम न करू देता शांत बसण्यास सांगावे.
सर्पदंश झालेला अवयव हृदयाच्या खालच्या पातळीवर ठेवावा. जखम हळूवारपणे जंतुनाशकाने स्वच्छ करावी.
सर्पदंश झालेल्या भागाच्या वर व खाली आवळपट्टी बांधावी, मात्र ती घट्ट बांधू नये. तत्काळ दवाखान्यात न्यावे.
साप आढळला तर...
आपल्या संस्कृतीचा विचार केला तर सापांची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे.
केवळ घरापरिसरात किंवा कामाच्या ठिकाणी साप आढळला तर त्याच्यावर हल्ला चढवायचा हे योग्य नाही.
यावेळी वेळ न गमावता सर्पमित्रांना संपर्क करावा. परिवारातील, जवळच्या व्यक्तींना कल्पना द्यावी.
स्वत: सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. सर्पमित्रांच्या संपर्कात रहावे.
प्रथमोपचार महत्त्वाचे
सापांविषयी समाजात गैरसमज असल्याने सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. सर्पदंश झाला म्हणजे आता मृत्यू येणारच असा समाज असल्याने अनेक जण धास्तीने जीव गमावतात. मात्र, योग्य वेळी योग्य उपचार झाले तर विषारी साप जरी चावला असेल तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर योग्य पद्धतीने केलेले प्रथमोपचार लाख मोलाचे ठरतात. साप आढळल्यास ताबडतोब संपर्क करावा.
- बाळ काळणे, सर्पमित्र