राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील पहिले देशी बीजी-२ कापसाचे वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या वाणाची कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सध्या चाचणी घेणे सुरू आहे; पण पावसाने दडी मारल्याने हे संशोधन सूक्ष्म सिंचनावर (ड्रिप्स) जगविण्यात येत आहे. भरपूर पाणी नसल्याने या चाचणीचे काय निष्कर्ष येतात, हे पिकाची पूर्ण वाढ झाल्यावर कळणार आहे.देशातील पहिले बीजी-२ कापसाचे पीडीकेव्ही-जेकेएल -११६ वाण तयार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन विभागांतर्गत पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर सध्या या संशोधित वाणाच्या चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. पेरणीला १0 दिवस झाले आहेत; परंतु पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले कापसाचे वाण कोमेजले आहे. सात-आठ वर्षांंंंच्या प्रदीर्घ संशोधनानंतर हे वाण विकसित करण्यात यश आले आहे आणि नेमके चाचणीच्या वेळीच पावसाचे पाणी नसल्याने कृषी शास्त्रज्ञांची धावपळ सुरू आहे. सध्या ही चाचणी पीक दोन पानावर आहे. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा खारपाणपट्टय़ात आहे. येथील भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. कृषी विद्यापीठाकडे या पाण्याशिवाय दुसरा पाण्याचा स्रोत नसल्याने हेच पाणी या संशोधनासाठी ड्रिपद्वारे देण्यात येत आहे. त्याचा परिणाम समोर येईलच; पण शास्त्रज्ञांची घालमेल सुरू आहे.कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर इतरही अतिघनता कापसाची बीजोत्पादनासाठी पेरणी करण्यात येत आहे; पण पाऊसच नाही. यावर्षी बहुतांश खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात बीजोत्पादन घेण्याचा कृषी विद्यापीठाचा विचार आहे. त्यासाठी वेळेत पेरणी होणे गरजेचे आहे; परंतु सर्वकाही पावसावर अवलंबून असल्याने कृषी शास्त्रज्ञ हतबल आहेत.कृषी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्रावर विविध पाण्याचे मॉडेल तयार करण्यात आले आहेत. आता या सर्वांंंंंसाठी पावसाची गरज आहे.बीजी-२ कापसाची चाचणी घेण्यात येत आहे. पाऊस नसल्याने सूक्ष्म सिंचनावर संगोपन सुरू आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. - डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
बीजी-२ कापसाचे नवे संशोधन सूक्ष्म सिंचनावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 4:42 AM