शिर्ला /बाळापूर (अकोला) : सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बुधवारी पातुर, बाळापूरात हिंसक वळण लागले. शांततेत सुरु असलेल्या रास्ता रोको दरम्यान काही आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.बहूजन क्रांतीच्या वतीने बुधवार २९ जानेवारी रोजी संपूर्ण भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर उतरलेल्या हजारो नागरिकांनी सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात विविध फलक घेऊन उतरलेल्या नागरिकांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. दरम्यान, काही आंदोलकांनी अचानक दगडफेक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या, तर बिकानेर रेस्टारंटचेही नुकसान झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी अमोल इंगळे, यासीन खान यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. पातूरात आक्रमक आंदोलकांनी शिवसेनेचे पोस्टर फाडल्यामुळे परिस्थती तणावपूर्ण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे परिस्थीत निवळली आहे.बाळापूरातही दगडफेकभारत बंद दरम्यान बाळापूर येथेही आंदोलनास हिंसक वळण लागले. संतत्प झालेल्या आंदोलकांनी अचानक दगडफेक केल्यामुळे परिस्थती चिघळली होती. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर जमाव नियंत्रणात आला.