अकोला: गत पाच ते सहा महिन्यांपासून विदर्भात भारत गॅसच्या प्लांटला गॅस टँकरचा पुरवठाच होत नसल्याने विदर्भात भारत गॅसच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दोन दिवसांनी येणाऱ्या सिलिंडरसाठी २० ते २५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे, तर वितरकांचीही डोकेदुखी वाढली आहे.भारत गॅस सर्व्हिसेसचे जळगाव आणि बुटीबोरी असे दोन प्लांट असून, येथूनच विदर्भातील अकराही जिल्ह्यांत गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो; मात्र जळगाव प्लांटमध्ये जवळपास सहा महिन्यांपासून गॅस टँकरचा नियमित पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे. प्लांटमध्ये गॅसच उपलब्ध नसल्याने सिलिंडर भरून ते वितरकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे. दुसरीकडे बुटीबोरी येथील प्लांटमध्ये सिलिंडरचा माल वितरकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनेच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील बहुतांश वितरकांपर्यंत भारत गॅस पोहोचत नसल्याचा प्रकार घडत आहे. भारत गॅसच्या नॉर्थ आणि वेस्ट झोनच्या दोन्ही प्लांटमध्ये तांत्रिक समस्यांमुळे विदर्भात भारत गॅसच्या सिलिंडरसाठी ग्राहकांना २० ते २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत सिलिंडरसाठी चकरा माराव्या लागत असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.बुटीबोरीत टेक्निकल टेंडरची समस्यानागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे असलेल्या भारत गॅसच्या प्लांटमध्ये वितरणासाठी गाड्यांची समस्या असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गाड्यांसाठी टेंडरची समस्या येत आहे. जोपर्यंत टेंडरची समस्या निकाली लागत नाही, तोपर्यंत पूर्व विदर्भात भारत गॅसच्या ग्राहकांची डोकेदुखी कायम असणार आहे.हे जिल्हे प्रभावितजळगाव प्लांट अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा हे चार जिल्हे, तर बुटीबोरी प्लांट अंतर्गत अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली हे सात जिल्हे प्रभावित झाले आहेत.मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे वितरकांपर्यंत सिलिंडर पोहोचण्यास विलंब होत असला, तरी तीन ते चार दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल.- सुमित देवगडे, सेल्स आॅफिसर, भारत गॅस, जळगाव प्लांट.