अकोला : जिल्ह्यातील सातपैकी पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याची तयारी भारिप-बमसंने केली आहे. त्यापैकी दोन पंचायत समित्यांमध्ये निर्विवाद बहुमत असल्याने तीन पंचायत समित्यांमध्ये इतर पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जात आहे. त्यासाठी संबंधित पंचायत समित्यांचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. सोबतच शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार असल्याने भारिप-बमसंचे २५ सदस्य मंगळवारी सायंकाळी अज्ञात स्थळी रवाना झाले. तर शिवसेनेने गटनेतापदी गोपाल दातकर यांची निवड केली आहे.जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापतींची निवड गुरुवारी होणार आहे.त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारिप-बमसंला अकोला, बाळापूर पंचायत समितीमध्ये बहुमत आहे. तसेच त्या सदस्यांच्या गटनेत्याची निवडही करण्यात आली. गटनेत्याने बजावलेला पक्षादेश पाळणे सदस्यांना बंधनकारक राहणार आहे. अकोट पंचायत समितीमध्ये एका सदस्याची गरज आहे. त्या ठिकाणी काँग्रेसच्या सदस्याच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तेल्हारा पंचायत समितीमध्येही तीच परिस्थिती आहे. इतर कोणत्याही पक्षाचा एक सदस्य सत्तास्थापनेसाठी सोबत येणार असल्याचे सांगण्यात आले. बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये भारिप-बमसंचे पाच सदस्य आहेत. तेथे भाजपचे तीन सदस्य सत्तास्थापनेसाठी सोबत असल्याची माहिती आहे. ते सर्व सदस्य मंगळवारीच अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये सत्तास्थापनेचे चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. तर पातूर पंचायत समितीमध्ये शिवसेना ६, भारिप-बमसं-५ व काँग्रेसचा एक सदस्य आहे. सभापती-उपसभापतीची निवड ईश्वरचिठ्ठीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.