व्यावसायिकांचा संमिश्र प्रतिसादलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने अवाजवी कर वाढ केल्याचा आरोप करीत मनपातील भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी पुकारलेल्या जठारपेठ बंदला व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. पक्षाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारनंतर व्यावसायिकांनी दुकाने पूर्ववत सुरू केल्याचे दिसून आले. महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पहिल्यांदाच ‘जीआयएस’ प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. मालमत्तांचे अचूक मोजमाप केल्यानंतर ३० ते ६० टक्क्यांपर्यंत कराच्या रकमेत वाढ केली. ही वाढ अवास्तव असून, यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांवर अतिरिक्त बोजा पडत असल्याचे स्पष्ट करीत महापालिकेच्या करवाढीला मनपातील विरोधी पक्ष भारिप-बमसंने विरोध दर्शविला. कर वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप यांनी १९ मे रोजी जठारपेठ परिसर बंदची हाक दिली होती. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत परिसरातील व्यावसायिक त्यांची दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवतील, असे भारिपच्या वतीने नमूद करण्यात आले होते. भारिपने बंद पुकारल्यानंतर दुपारनंतर व्यावसायिकांनी त्यांची प्रतिष्ठाने, दुकाने पूर्ववत सुरू केल्याचे दिसून आले. परिसरातील व्यावसायिकांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.स्वाक्षरी मोहीम राबविली!करवाढीच्या मुद्यावर नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भारिप-बमसंच्या वतीने जठारपेठ भागात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी गटनेत्या धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप, डॉ. राजकुमार रंगारी, प्रतिभा अवचार, अरुंधती शिरसाट, वंदना वासनिक, विजय वाघ, दिलीप देशपांडे, बबलू तिवारी, भीमराव तायडे आदी उपस्थित होते.
करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंचा बंद
By admin | Published: May 20, 2017 1:28 AM