अकोला : जिल्हा परिषदेत गेल्या २० वर्षापासून सत्तेत असलेल्या भारिप-बमसंने यावेळीही सत्ता कायम ठेवली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रीयेत भाजपच्या ७ सदस्यांनी बहिर्गमन केले. सभागृहात २५ विरूद्ध २१ मतांनी अध्यक्षपदी प्रतिभा बापुराव भोजणे, उपाध्यक्षपदी सावित्री हिरासिंग राठोड यांची निवड झाली. महाआघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल दातकर, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील धाबेकर पराभूत झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंचे सर्वाधिक २३ सदस्य विजयी झाले. तर दोन अपक्षही त्यांना सामिल झाले. त्यांची संख्या २५ असताना जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीचेही प्रयत्न सुरू झाले. शिवसेनेचे १३, काँग्रेस-४, राष्ट्रवादी-३ एक अपक्ष मिळून ही संख्या २१ होती. त्यांना भाजपचे पाठबळ मिळेल, या अपेक्षेने भाजपसोबत चर्चा झाली. त्यानुसार अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे गोपाल दातकर, काँग्रेसचे सुनील धाबेकर तर उपाध्यक्षपदासाठीही त्या दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले. निवड प्रक्रीयेचा सुरूवात होण्यापूर्वी धाबेकर यांनी अध्यक्षपदाचा तर दातकर यांनी उपाध्यक्षपदाची अर्ज मागे घेतला. भाजपच्या गटनेत्या माया कावरे यांच्यासह सात सदस्यांनी निवड प्रक्रीयेला सुरूवात होण्यापूर्वी उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करीत सभागृहातून बहिर्गमन केले. त्यावेळी सभागृहात एकुण ४६ सदस्य उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या प्रतिभा बापुराव भोजणे व शिवसेनेचे गोपाल दातकर यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या सावित्री राठोड व काँग्रेसचे सुनील धाबेकर यांच्यात लढत झाली. भारिपच्या उमेदवारांना २५ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना २१ मते मिळाली. महाविकास आघाडीमध्ये अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांचाही सहभाग होता. विशेष सभेचे पिठासीन अधिकारी नरेंद्र लोणकर, सहाय्यक अधिकारी सूरज गोहाड यांनी निवड प्रक्रीया पूर्ण केली.
अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचा झेंडा; अध्यक्षपदी प्रतिभा भोजने, उपाध्यक्षपदी सावित्री राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 3:48 PM