अकोला: जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची मंगळवारी निवड करण्यात आली. त्यामध्ये सातपैकी आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर व तेल्हारा या पाच पंचायत समित्यांवर भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व राखले. तर अकोला पंचायत समितीवर भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती आणि मूर्तिजापूर पंचायत समितीवर भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला आहे.जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती-उपसभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने, पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली. त्यामध्ये गत अडीच वर्षांपूर्वीप्रमाणेच पाच पंचायत समितींवर भारिप-बमसंने वर्चस्व राखले आहे. तर अकोला पंचायत समितीवर शिवसेना-भाजप-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस महायुती आणि मूर्तिजापूर पंचायत समितीवर भाजप-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पुन्हा झेंडा फडकला आहे. त्यामध्ये आकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी भारिप -बमसंच्या आशा एखे व उपसभापतीपदी भारिप-बमसंच्या सूर्यकांता घनबहाद्दूर, बाश्रीटाकळी सभापतीपदी भारिपचे भीमराव पावले व उपसभापतीपदी काँग्रेस-शिवसेना-भाजप युतीचे सतीश पवार, पातूर पंचायत समिती सभापतीपदी भारिपच्या सविता धाडसे व उपसभापतीपदी भारिपच्या नईमाबानो शे.मोबीन, तेल्हारा पंचायत समिती सभापतीपदी भारिपच्या आशा इंगळे व उपसभापतीपदी भारिपचेच सचिन झापर्डे, बाळापूर पंचायत समिती सभापतीपदी भारिपच्या मंगला तितूर व उसभापतीपदी अनिताबी शे. फिरोज यांची निवड करण्यात आली. तर अकोला पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना-भाजप-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अरुण परोडकर व उपसभापतीपदी महायुतीचेच गणेश अंधारे तर मूर्तिजापूर पंचायत समिती सभापतीपदी भाजप-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या भावना सदार व उपसभापतीपदी आघाडीच्याच उमेश मडगे यांची निवड करण्यात आली आहे.
पाच पंचायत समितींवर भारिपचे वर्चस्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 2:14 AM