अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, मंगळवारी भारिप बहुजन महासंघाचे २४ जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत, तर शिवसेना संपर्क नेते तथा खासदार अरविंद सावंत बुधवारी अकोल्यात येत असून, ते शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेची भूमिका निश्चित करण्यसाठी शिवसेनेचे पश्चित विदर्भ संपर्क नेते खा. अरविंद सावंत बुधवारी अकोल्यात येत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा परिषद गटनेत्या ज्योत्स्ना चोरे यांच्यासह पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन, त्यांची मते ते जाणून घेणार आहेत. त्यामध्ये भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांना सोबत घेवून महाआघाडीच्या ह्यफामुर्ल्याह्णवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भारिप-बमसं आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक बुधवारी होणार आहे. भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, सुनील धाबेकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
भारिपचे जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळी!
By admin | Published: June 29, 2016 2:12 AM