लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्यांच्या प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश’ धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, कृषी पंपांना अखंड १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा व शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये, तुरीला सात हजार रुपये, कापसाला नऊ हजार रुपये भाव देण्यात यावा व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतमालाची ऑनलाइन विक्री बंद करण्यात यावी, ‘क्रीमी लेयर’मधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची करण्यात आलेली शिफारस रद्द करण्यात यावी, जिल्हय़ातील खड्डेमय रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, यासह इतर मागण्यांसाठी भारिप-बमसंच्यावतीने ‘शेतकरी आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. शहरातील टॉवरस्थित भारिप-बमसं कार्यालयापासून काढण्यात आलेला मोर्चा टॉवर चौक, बसस्थानक चौक, गांधी चौक मार्गे पंचायत समितीसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. पक्षनेत्यांच्या एका शिष्टमंडळामार्फत विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांना देण्यात आले. या मोर्चात भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष तथा आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, माजी आमदार हरिदास भदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, डी.एन. खंडारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जमीरउल्लाखा पठाण, गजानन गवई, अशोक शिरसाट, आसिफ खान, राजुमिया देशमुख, अँड. धनश्री देव, किरण बोराखडे, बबलू जगताप, डॉ. प्रसन्नजित गवई, प्रा. शैलेश सोनोने, बालमुकुंद भिरड, सरला मेश्राम,रेखा अंभोरे, देवका पातोंड, अरुंधती शिरसाट, सम्राट सुरवाडे, सुभाष रौंदळे, बुद्धरत्न इंगोले, पराग गवई, प्रदीप वानखडे, दामोदर जगताप, अँड. संतोष राहाटे, रणजित वाघ, विकास सदांशिव, अमोल शिरसाट, सचिन शिराळे, मनोरमा गवई, राहुल अहिरे, शेख साबीर, रवी पाटील, मिलिंद वाकोडे, विशाल पाखरे, मनोहर पंजवाणी, संगीता खंडारे, पार्वती लहाने, विद्या अंभोरे, प्रा. मंतोष मोहोळ, प्रभा शिरसाट, कोकिळा वाहुरवाघ, सिद्धार्थ शिरसाट यांच्यासह भारिप-बमसंचे जिल्हय़ातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारला धडा शिकवा; धोरणाचा नोंदविला निषेध!केंद्र व राज्यातील सरकारने जनतेला अनेक आश्वासनांची खैरात वाटली तसेच शेतकर्यांना विकासाची स्वप्ने दाखविली; मात्र तीन वर्षे उलटूनही सरकारने काहीच केले नसल्याने, शेतकर्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे, असा आरोप करीत सरकारला धडा शिकविल्याशिवाय आता पर्याय नाही, असे आवाहन आ. बळीराम सिरस्कार, काशीराम साबळे, डी.एन. खंडारे, प्रतिभा अवचार, संध्या वाघोडे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यासह इतर नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना केले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेधही यावेळी करण्यात आला.