विवेक चांदूरकर / अकोलाचटपट, चमचमीत भेल, पाणीपुरी म्हटले की, प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटते. रोज सायंकाळी आपण आवडीने खात असलेल्या या पाणीपुरी व्यवसायाची उलाढाल मात्र थक्क करणारी आहे. केवळ अकोला शहरात एका दिवसात कोट्यवधी रुपयांची पाणीपुरी अकोलेकर फस्त करतात. सायंकाळी घरी बसून बोअर होण्यापेक्षा बाहेर फिरून थोडी पाणीपुरी खाण्याची अनेकांची सवय असते. पाच- दहा रुपये खर्च करून आपल्या जिभेची चव शांत होत असली तरी यातून कोट्यवधींची उलाढाल होत असून, शेकडोंचे संसार चालतात. भेल, पाणीपुरीच्या गाड्या आपल्याला चौकाचौकात पाहायला मिळतात. या गाड्यांवर पाणीपुरी, दहीपुरी, सेवपुरी, भेल, खस्ता, दहीवडा आदी पदार्थ मिळतात. शहरात अशा गाड्या शेकडोंच्या संख्येत आहेत. मात्र, पाणीपुरी व भेलचे साहित्य सर्वत्र मिळत नाही तर हे साहित्य बनण्याची काही ठरावीक ठिकाणं आहेत. चिल्लर विक्रेता यांच्याकडून साहित्य खरेदी करतात व विक्री करतात. सिंधी कॅम्पमधील कच्ची व पक्की खोली परिसर, हरिहर पेठेतील पाटील यांच्या घरासह पोळा चौकात काही ठिकाणी पाणीपुरी बनविण्यात येते. सकाळी ५ वाजतापासून तर रात्री ११ वाजेपर्यंंत पाणीपुरी बनविण्याचे काम चालते. हरिहर पेठेतील गोपाल टेहरे पाटील गत ३0 वर्षांंपासून हा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायात असून, भावांसह त्यांच्या १0 गाड्या शहरात विविध ठिकाणी लागतात. त्यांच्या स्वत:च्या तीन गाड्या असून, याकरिता ते दररोज ८ ते १0 हजार पाणीपुरी बनवितात. तसेच दीडशे प्लेट दहीपुरी व पाच किलो चिवडा, ४ किलो सेव भेलसाठी बनविण्यात येतात. शहरातील सिंधी कॅम्प येथे अनेक ठिकाणी भेल व पाणीपुरीचे साहित्य बनविण्यात येते. *शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह पाणीपुरी बनविण्यापासून तर विक्री करणार्यांपर्यंंत शेकडो नागरिक या व्यवसायात गुंतले आहेत. सिंधी कॅम्पमधील पाणीपुरी बनविण्याच्या एकाच घरात २0 ते २५ कामगार काम करतात. यामध्ये पाच ते सात महिला पाणीपुरीच्या पोळ्या लाटण्यासाठी, चार ते पाच पुरुष ते तळण्यासाठी व काही कामगार मसाला बनविण्याचे काम करतात. हे काम सकाळी पाच वाजतापासून सुरू होते तर सायंकाळपर्यंंत चालते. जसजसा माल तयार होतो, तो पाणीपुरी विक्रेत्यापर्यंंत पोहोचविण्यात येतो. त्यामुळे पाणीपुरी बनविण्यापासून पोहोचविणारे व विकणार्यापर्यंंत अनेकांना यापासून रोजगार मिळतो व त्यांचे संसार यावर चालतात. *पाणीपुरी बनविणार्या यंत्रांचा आविष्कार पूर्वी पाणीपुरी हाताने पोळ्या लाटून बनविण्यात येत होती. आता मात्र पाणीपुरी बनविण्याचे यंत्र आले आहे. हे यंत्र साडेचार लाख रूपयांचे असून, यातून एका तासातच हजारो पाणीपुरी तयार होतात. त्यानंतर त्यांना केवळ तेलातून तळावे लागते. अशाप्रकारे आणखी काही यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. याचा वापर आता पाणीपुरी बनविणारे करीत आहेत.
भेल, पाणीपुरी व्यवसायाची कोटी- कोटी उड्डाणे
By admin | Published: October 31, 2014 1:25 AM