बबन इंगळे
सायखेड (अकोला) : दैवी शक्ती असल्याचा बनाव करून अघोरी पद्धतीने उपचार करणार्या मांडोली येथील माणिक महाराज ऊर्फ माणिक कसनदास जाधव या भोंदू बाबाला जादूटोणाविरोधी कायद्यानुसार बाश्रीटाकळी सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच फसवणूक केल्याप्रकरणी आणखी तीन वर्षे शिक्षा व दोन हजारांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रीतपणे भोगाव्या लागणार आहेत. जादूटोणाविरोधी कायद्यानंतर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाल्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील मांडोली या आदिवासीबहुल गावात माणिक महाराज हा पौर्णिमा व अमावास्येला महालक्ष्मी मंदिरात दरबार घेत होता. तेथे तो आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून कुठलाही मोठा आजार बरा करीत असल्याचा दावा करीत होता. याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाल्यानंतर समितीच्या पदाधिकार्यांनी १४ मे २0१४ रोजी भोंदू बाबाचा पर्दाफाश केला होता. तसेच डॉ. गजानन नारायण पारधी यांनी माणिक महाराजविरुद्ध बाश्रीटाकळी पोलिसांत फिर्याद दिली हो ती. त्यांच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी माणिक महाराजविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २0१३ च्या कलम २ (१) ख सह ३ नुसार व फसवणूकप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बाश्रीटाकळी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी माणिक महाराज ऊर्फ माणिक कसनदास जाधव यास दोषी ठरवून जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच पैसे घेऊन फ सवणूक केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड बाश्रीटाकळी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परेश रा. वागडोळे यांनी ठोठावला. याप्रकरणी सरकारी पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील अँड. सचिन दादाजी बेरकर यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे व्ही. एम. किर्तक यांनी काम पाहिले.