अकोला -छत्तीसगढ राज्यातील सक्ती रेल्वे स्थानकाला हावडा-मुंबई लोहमार्गावरील चवथ्या लाईनशी जोडणे आणि या स्थानकाच्या यार्डच्या रीमॉडेलिंगचे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. हे पूर्ण करण्यासाठी ९ ते २३ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस ही अकोला स्थानकावरून जाणारी गाडी १४ व १६ ऑगस्ट रोजी धावणार नसल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
सक्ती स्टेशन हावडा-मुंबई मुख्य मार्गावर आहे. नागपूर ते बिलासपूर आणि येथून झारसुगुडा या मार्गावर चौथी लाईन टाकण्यात येत आहे. यातील काही विभागांमध्ये चौथ्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गासोबतच त्यामध्ये गाड्यांची वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सक्ती रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्माण आणि या स्थानकाशी चौथी मार्गिका जोडण्याची तयारी सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सक्ती स्थानकावर नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ९ ते २३ ऑगस्टपर्यंत गाड्यांवर परिणाम होणार आहे.
काही गाड्या १३ दिवस धावणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. १२८८० भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ ऑगस्ट रोजी प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे. तर १२८७९ कुर्ला-भूवनेश्वर एक्स्प्रेस १६ ऑगस्ट रोजी प्रस्थान स्थानकावरून धावणार नाही. याशिवाय अकोला स्थानकावरून जाणारी परंतु थांबा नसणारी २०८२२ संत्रागाछी-पुणे एक्स्प्रेस व २०८२१ पुणे-संत्रागाछी एक्स्प्रेस अनुक्रमे १२ व १४ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय इतर १५ गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.