अकोला: सायकल खरेदीसाठी निधीचा ठावठिकाणा नसताना मनपा शाळेतील मुख्याध्यापकांनी तब्बल ५३ लाख रुपयांच्या सायकलींची परस्पर खरेदी केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, खुलासा सादर करण्यासाठी गुरुवारी शिक्षण विभागात मुख्याध्यापकांची लगबग पाहावयास मिळाली.महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनिषा भंसाली यांनी मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाºया १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यासाठी ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवल्यानंतरही मनपा शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना सायकल खरेदीचे निर्देश दिले. खरेदी केलेल्या सायकलची पावती शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली. या दरम्यान, २८ जुलै रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सायकल खरेदीसाठी ८७ लाख रुपयांचा प्रस्ताव बाजूला सारल्यानंतरही मुख्याध्यापकांनी ५३ लाख रुपयांच्या सायकलची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी व मुख्याध्यापकांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सभापती सतीश ढगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मनिषा भंसाली तसेच शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी उपायुक्त वैभव आवारे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. यादरम्यान, शिक्षण विभागाने मनपा शाळेतील सर्व ३३ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले असता, गुरुवारी शिक्षण विभागात खुलासा सादर करण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू असल्याचे दिसून आले.सत्ताधाऱ्यांकडे ‘फिल्डींग’मनपा प्रशासनाच्या कोणत्याही सूचना, निर्देश नसताना मुख्याध्यापकांनी परस्पर सायकल खरेदीचा निर्णय घेतल्याचे तूर्तास दिसत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी काही मुख्याध्यापकांकडून सत्ताधारी भाजपकडे ‘फिल्डींग’लावली जात असल्याची माहिती आहे.
मुख्याध्यापकांच्या भूमिकेकडे लक्षसायकल खरेदीसाठी मनपाच्या सर्वसाधारण सभेने ८७ लाख ६६ हजारांचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात आयोजित एका बैठकीत महिला व बालकल्याणच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामोदर यांनी मौखिक निर्देश दिल्याचे समोर आले आहे, तसेच शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनीसुद्धा मौखिक निर्देश दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी किंवा मौखिक निर्देश दिले नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे ‘शो कॉज’मध्ये मुख्याध्यापक काय नमूद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.