लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या बालकल्याण विभाग तसेच शिक्षण विभागाच्या लेखी परवानगीशिवाय मुख्याध्यापकांनी ५३ लाख रुपये किमतीच्या सायकली खरेदी केल्याप्रकरणाची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागात सादर केलेल्या सर्व फायली सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिल्याची माहिती आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यासाठी महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवल्यानंतरही मुख्याध्यापकांनी ५३ लाख रुपयांच्या सायकलची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पालकांनी खरेदी केलेल्या सायकलच्या पावत्या शिक्षण विभागात सादर केल्या आहेत.निधी उपलब्ध नसल्यामुळे सायकल खरेदी करण्याचे कोणतेही लेखी अथवा मौखिक निर्देश दिले नसल्याचे शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामोदर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे लेखी आदेश नसताना पालकांना सायकल खरेदी करण्याचे निर्देश देणारे मुख्याध्यापक आता अडचणीत सापडले आहेत. प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागात सादर केलेल्या सायकलींच्या देयकांच्या फायली सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
... तर मुख्याध्यापकांवर कारवाई निश्चितक्रीडा स्पर्धांच्या संदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीत महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामोदर यांना काही मुख्याध्यापकांनी सायकल खरेदीच्या संदर्भात विचारणा केली असता नंदिनी दामोदर यांनी काही माहिती दिली होती. इतर वेळी कागदीघोडे नाचविल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात न करणाºया मुख्याध्यापकांनी सायकल खरेदीचा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई निश्चित मानले जात आहे.
शिवसेना-काँग्रेसची उडी! मुख्याध्यापकांना लेखी किंवा मौखिक आदेश दिल्याशिवाय ते सायकलची खरेदी करूच शकत नसल्याचे नमूद करीत या प्रकरणात विरोधी पक्ष शिवसेना व काँग्रेसने उडी घेतली आहे. मनपा आयुक्तांनी कोणाचीही पाठराखण न करता कारवाई करावी. अन्यथा पोलिसात तक्रार देण्याचा इशारा सेनेचे गटनेता राजेश मिश्रा व काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी दिला आहे.