लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सायकल खरेदीच्या प्रक्रियेसंदर्भात महिला व बाल कल्याणच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामोदर यांनी मौखिक निर्देश दिल्याचे सांगत या प्रकरणी आर्थिक अनियमितता झाली नसल्याचा खुलासा महापालिकेच्या २८ शाळांमधील मुख्याध्यापकांनी सादर केला आहे. गरीब विद्यार्थ्यांना सायकल मिळावी या उद्देशातून ‘डीबीटी’प्रक्रियेसाठी पावत्या जोडण्यात आल्याचेही मुख्याध्यापकांनी नमूद केल्याची माहिती आहे.मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यासाठी महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली होती.हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवल्यानंतरही मुख्याध्यापकांनी ५३ लाख रुपये किमतीच्या सायकलची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. पालकांनी खरेदी केलेल्या सायकलच्या पावत्या शिक्षण विभागात सादर केल्या आहेत. निधी उपलब्ध नसल्यामुळे सायकल खरेदी करण्याचे कोणतेही लेखी अथवा मौखिक निर्देश दिले नसल्याचे शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामोदर यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे लेखी आदेश नसताना पालकांना सायकल खरेदी करण्याचे निर्देश देणारे मुख्याध्यापक अडचणीत सापडले. या प्रकरणाची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी उपायुक्त वैभव आवारे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.यादरम्यान, २८ मनपा शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रशासनाकडे खुलासा सादर केला असता, यामध्ये महिला व बाल कल्याणच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामोदर यांनी मौखिक निर्देश दिले होते. त्यानंतर सायकल खरेदीसाठी पुढाकार घेतल्याचे नमूद केले आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांचा खुलासा सादरमनपाच्या स्थायी समितीने ८७ लाख ६६ हजार रुपयांचा प्रस्ताव बाजूला सारल्यानंतर मुख्याध्यापकांनी परस्पर सायकल खरेदी केल्या कशा, असा सवाल उपस्थित झाल्यामुळे प्रशासनाने शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना व नंदिनी दामोदर यांना खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी शिक्षणाधिकारी व महिला बाल कल्याणच्या अधिकाºयांनी खुलासा सादर केल्याची माहिती आहे.
प्रकरणाची गुंतागुंत वाढली!शासनाच्या निर्देशानुसार ‘डीबीटी’नुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा क रणे भाग आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशातून मनपा मुख्याध्यापकांनी पालकांजवळून सायकल खरेदी केल्याच्या पावत्या जमा करून घेतल्याची माहिती आहे. अर्थात, या बदल्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम न केल्यामुळे या प्रकरणी आर्थिक अनियमितता झाली नाही, असा दावा काही मुख्याध्यापकांनी केल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.