अकोला : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) ला समर्थन व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे रविवारी अकोल्यात महारॅली काढण्यात आली. मुंगीलाल बाजोरीया शाळेच्या प्रांगणातून प्रारंभ झालेल्या या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय समोरच्या चौकात झाला. संपूर्ण जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक तिरंगा व भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते.नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच ‘सीएए’ तसेच ‘एनआरसी’ समर्थनार्थ रविवारी शहरातील रस्त्यावर हजारोंच्या संख्येने जनसागर ओसांडला. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे पोलिसांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. मुंगीलाल बाजोरीया मैदानातून निघालेल्या रॅलीमध्ये तिरंगा व भगवे झेंडे घेऊन तरुणाईने सीएएच्या समर्थनार्थ नारे दिले.
राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे रविवारी मुंगीलाल बाजोरीया मैदानातून ‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ महारॅली काढण्यात आली. रॅलीला सुरुवात होताच राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाप पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी नागरिकांनी हाती तिरंगा व भगवे झेंडे घेत ‘सीएए’ समर्थनार्थ घोषणा दिल्यात. येथून ही रॅली अशोक वाटिका चौक मार्गे धिंग्रा चौकात पोहोचली. धिंग्रा चौकातून ही रॅली खुले नाट्यगृह, गांधी चौक मार्गे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौकात पोहोचली. दरम्यान शहरातील विविध भागातून निघालेले नागरिकत रॅलीत जुळत गेल्याने ही संख्या हजारोवर पोहोचली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देत ही महारॅली होमगार्ड कार्यालयमार्गे तहसील चौक व येथून जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहोचली. लोकांपर्यंत कायद्याची वास्तविकता यावी, या दृष्टिकोनातून ‘सीएए’ व ‘एनआरसी’ कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयसमोरच्या चौकात पोहचल्यानंतर रॅलीचे रुपांतर विशाल सभेत झाले. तेथे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी मंचावर आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.