लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराच्या बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या बियाणी चौक ते शिवाजी पार्क काँक्रिटीकरण मार्गाचे बांधकाम इतर मार्गांसारखे रेंगाळणार नाही, ते सहा महिन्यांच्या आत गतीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. दैनंदिन वाहतूक आणि दररोज नव्याने उद्भवणार्या समस्यांमधून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सिटी कोतवाली ते बियाणी चौक मार्गाच्या लहान अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे बांधकाम गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. सातत्याने रेंगाळत असलेल्या या मार्ग बांधकामामुळे मार्गाच्या दोन्हीकडील दुकानदार अक्षरश: त्रासलेत. या बांधकामामुळे नागरिकांनी या मार्गावरील दुकानातून खरेदी करणे सोडले होते. त्यामुळे या मार्गावरील दुकानदारांचे एका वर्षात लाखो रुपयांचे नुकसान झाले. अजूनही नागरिकांच्या वापरात हा मार्ग आलेला नाही. या मार्गाचे लोकार्पण होण्याआधीच अकोला सार्वजनिक विभागाच्यावतीने या मार्गाच्या दुसर्या टप्प्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील पुढील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. बियाणीचौक ते शिवाजी पार्क मार्गावरील वाहतूक तात्पुरता ‘बीएसएनएल’ कार्यालयासमोरू न डीआयसी समोरून, अलंकार मार्केटच्या मागील बाजूने, त्रिवेणीश्वर मंदिरापर्यंत वळविण्यात आली आहे. त्यामुळे बियाणी चौक ते त्रिवेणीश्वर मंदिरापर्यंतचे दुकानदारांना आता चिंता लागली आहे. जर मार्ग बांधकाम संथ गतीने होत राहिले, तर या मार्गावरील दुकानदारांनादेखील लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान, येथील व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधींना गळ घालून मार्गाचे बांधकाम तातडीने करण्याची विनंती केली आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या सहा महिन्यांच्या आत या काँक्रिट मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा दावा केला जातो आहे; पण या मार्गावरील इलेक्ट्रिक, टेलिफोनचे पोल शिफ्टिंग करणे, खोदकाम करीत खडीकरण करण्याचे काम सोपे नाही. यातून सहा महिन्यांत काँक्रिट मार्गाची निर्मिती करणे आव्हान ठरत आहे.
सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क मार्गावर कायम वर्दळ असते. या मार्गावर बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. मागील टप्प्याच्या बांधकामास उशीर झाला. आता पुढच्या टप्प्याला उशीर होणार नाही. सहा महिन्यांच्या आत शिवाजी पार्कपर्यंतच्या काँक्रिट मार्गाचे बांधकाम करण्याचे कंत्राटदारास सांगितले आहे. -मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला.