जिल्हा परिषदअंतर्गत येत असलेल्या आदिवासी भागातील शहापूर जितापूर गट ग्रामपंचायतीच्या जितापूर गावातील सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्याकरिता लाखो रुपये निधी मंजूर करण्यात आला. परंतु सदर रस्ता तयार केलाच नाही. केवळ कागदोपत्री रस्ता तयार केल्याचे दर्शवून एमबी रेकॉर्ड करण्यात आले. दरम्यान, या कागदपत्रांबाबत संशय आल्याने सदर रस्त्याची तपासणी केली असता, रस्ता तयारच झाला नसल्याचे लक्षात आले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या शाखा अभियंता तुकाराम तूपसुंदरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी शिंदे करीत आहेत. कागदोपत्री बोगस रस्ता बनवणाऱ्या या प्रक्रियेमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहेत. याचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.