अतुल जयस्वाल, अकोला: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षी जनजागृती पुरस्कार अकोला येथील अमोल सावंत यांना, तर पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी राघवेंद्र नांदे यांना जाहीर करण्यात आला आहे. पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात.
या पुरस्काराचे वितरण ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथे २३-२४ डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविले आहे.