अकोला : पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या चायनीज मांजावर शासनाने बंदी घातली तरी पतंग विक्रेत्यांकडे मोठ्याप्रमाणावर चायनीज मांजा मिळत असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. ग तवर्षी झालेल्या कारवाईनंतरही विक्रेत्यांकडून चायनिज मांज्याची विक्री होत असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मकर संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे गत काही वर्षांत अपघाताच्या घटना वाढत आहेत. यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. पर्यावरणाला धोकादायक ठरत असलेल्या जीवघेण्या नायलॉन (चायनीज) मांजाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. यानंतर शासनाने पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ , कलम ५ अन्वये चायनीज मांजावर बंदीदेखील घातली; परंतु पतंगप्रेमी चायनीज मांजाचा नाद सोडत नसल्याने चायनीज मांजाची विक्री सुरूच आहे. मकरसंक्रातीचा सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत पतंग आणि मांजा दाखल झाला असून, यामध्ये चायनीज मांजादेखील असल्याची माहिती 'लोकमत'ला मिळाली; परंतु पर्यावरणाबाबत पतंगप्रेमी किती जागरूक आहेत तसेच प्रशासन याबाबत किती गाफील आहे, या अनुषंगाने 'लोकमत'ने सोमवारी स्टिंग आॅपरेशन केले. लोकमत चमू चायनीज मांजाच्या शोधात बाजारपेठेत दाखल झाली. सुरुवातीला काही पतंग विक्रेत्यांना मांजाबद्दल विचारले असता, त्यांनी साधा मांजा उपलब्ध असल्याचे सांगितले; परंतु आग्रह करताच ग्राहकांच्या मागणीनुसार चायनीज मांजा उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथून चमू दुसऱ्या विक्रेत्याकडे पोहोचली. येथे चायनीज मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. चायनीज मांजा मिळत असल्याने या ठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढली होती; परंतु येथे लोकमत चमू असल्याचे कळताच चायनीज मांजा मिळत नसल्याचे सदर दुकानदाराने ग्राहकांना सांगितले.
पक्ष्यांचा जीव जातोय, तरीही चायनीज मांजाचा नाद सुटेना!
By admin | Published: December 08, 2015 2:18 AM