अकोला: बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच गुरुवारी जिल्ह्यातील दहीगाव गावंडे परिसरात मृत कावळे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांकडून माहिती मिळताच पशुसंवर्धन उपायुक्तांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला, मात्र जिल्ह्यात अजून तरी बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.
बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने सतर्कतेबाबत सुचना दिल्या होत्या. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यातील दहीगाव गावंडे येथे मृतावस्थेत काही कावळे आढळले. त्यामुळे दहीगाव परिसरात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांच्या माहितीवरून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी त्यांच्या पथकासह दहीगाव गावंडे येथे भेट दिली. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला असता, त्यांना केवळ एक पक्षी मृतावस्थेत सापडला, तर काही पक्षांचे केवळ अवशेष आढळून आले.