अकोला : जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळे कुठलाही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास विशेष खबरदारी घेतली जात आहे, मात्र चाचणी अहवाल केवळ कोंबड्यांचाच उपलब्ध होत आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी कावळ्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्यांचा एकही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
जिल्ह्यात सर्वप्रथम दहिगाव गावंडे परिसरात मृतावस्थेत कावळे आढळले होते. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील नकाशी तलाव, मूर्तिजापूर तसेच अकोट तालुक्यातील कालवडी आणि अकोला शहरातील गौरक्षण संस्थान परिसरात मोठ्या संख्येने कावळे मृतावस्थेत आढळले हाेते. या पक्ष्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करत पशुसंवर्धन विभागातर्फे तिन्ही परिसरात विशेष खबरदारी घेण्यात आली होती. तिन्ही परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. मृत कावळ्यांचे नमुनेही तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, मात्र अद्याप एकाही कावळ्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे कोंबड्यांच्या चाचण्यांवर भर दिला जात असल्याने त्यांचे अहवाल काही दिवसातच मिळत आहेत. कावळ्यांसोबतच इतरही जंगली पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे याकाळात आढळून आले होते. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जंगली पक्ष्यांकडूनही बर्ड फ्लूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जंगली पक्ष्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर आवश्यक खबरदारी घेतली जात आहे, मात्र त्याचसोबत इतर पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कावळ्यांसोबतच इतर जंगली पक्षीही मृतावस्थेत आढळून येत आहेत. सोमवारी येथील सरकारी बगीचा परिसरात पोपट मृतावस्थेत आढळला. याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यानंतर काय कारवाई केली, यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही.
जंगली पक्ष्यांमध्ये नेमका कोणता रोग आहे, हे सांगता येत नाही. ‘बर्ड फ्लू’मुळे वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून इतरही पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, मात्र त्याचा अहवाल अद्यापही मिळालेला नाही. ज्याठिकाणचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, त्या परिसरात आवश्यक ती सर्वच कार्यवाही केली जात आहे.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला