अकोट तालुक्यातील कालवडी येथील पोल्ट्री फार्ममधील मृत पक्षांचे नमुने एच ५ एन १ चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आले आहेत. तसेच आले आहे. तसेच अकोट जवळील खासगी पाळलेल्या पक्षांचे, रामापूर येथे आढळलेल्या मृत मोराचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली आहे. निगेटिव्ह आल्यामुळे बर्ड फ्ल्यू संदर्भात जारी करण्यात आलेल्या चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी अकोला तालुक्यातील आगर येथील रहिवासी महेंद्र शिरसाट यांच्या परिसरातील दोन गावरान कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. पशुसंवर्धन विभागामार्फत त्यांचे नमुने चाचणीसाठी पुणे येथील रोग अन्वेषण विभागामार्फत भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत बाधित क्षेत्रापासूनचा १० किलो मीटर त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
१५ पैकी ४ सतर्क क्षेत्र रद्द
जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लू संदर्भात १५ अधिसूचना काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये अकोट, कालवडी, रामापूर आणि चाचोंडी या क्षेत्रांचा समावेश आहे. यासोबतच जंगली व इतर पक्षी आणि कावळे यांचे एकूण १७ नमुने पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.