अकोला : राष्ट्रीय पक्षी व राज्य पक्षीप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा एक पक्षी असावा, या उद्देशाने गत काही महिन्यांपासून पक्षी निवडणुक हा उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात अकोला शहराचा पक्षी निवडण्यासाठी निवडणुक होणार आहे. यामध्ये पाच पक्ष्यांना उमेदवारी देण्यात येणार असून, सर्वाधिक मत मिळणाऱ्या पक्ष्याला शहर पक्षी घोषीत करण्यात येईल. निसर्गप्रेमी संस्था व नागरिकांच्यावतीने ही निवडणूक पार पडणार आहे.कराड येथे पार पडलेल्या ३२ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात शहर पक्षी निवडणूक हा उपक्रम प्रत्येक शहरात राबविण्याचा ठरावा घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने सावंतवाडी, वर्धा, औरंगाबाद, जळगाव व अहमदनगर या शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. अकोल्यातही हा उपक्रम राबविण्यासंदर्भात अलिकडेच ज्येष्ठ पक्षीमित्र दिपक जोशी यांच्या मार्गदर्शनात एक सभा पार पडली. या सभेत निवडणु घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ही निवडणुक यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणुक अधिकारी, अकोला वन, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभाग, अकोला मनपा, विविध शाळा, महाविद्यालय व संस्था यांचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, सर्वांच्या सहकार्याने निवडणूक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या सभेला मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, आधार फाऊंडेशनचे संदीप सरडे, निसर्गकट्टाचे अमोल सावंत, शिवा इंगळे, कल्याणी देशमुख, प्रगती केदार, दिप्ती धोटे, यशा देशमुख आदी उपस्थित होते.अशी होईल निवडणूकया निवडणूकीत सर्व पक्षीमित्रांच्या एकमताने पाच पक्ष्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या पाच उमेदवार पक्ष्यांचे महत्व, त्यांची पर्यावरणातील भूमिका, त्यांच्या समस्या आदी गोष्टी सर्व मतदारांना समजावून सांगण्यात येतील. महाविद्यालयीन विद्यार्थी व पक्षीमित्र या उमेदवारांचा प्रचार करतील. शेवटच्या टप्प्यात मतदान घेऊन सर्वाधिक मते मिळालेल्या पक्ष्याला शहर पक्षी म्हणून घोषीत करण्यात येईल.
राष्ट्रीय पक्षी मोर, राज्याचा पक्षी हरीयाल याप्रमाणे प्रत्येक शहराचा पक्षी असावा, या उद्देशाने पक्षी निवडणुकीचा उपक्रम राबविल्या जात आहे. अकोल्यातही जानेवारी महिन्यात ही निवडणूक घेण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे.- दिपक जोशी, ज्येष्ठ पक्षीमित्र, अकोला.