ऑनलाइन लोकमत /विजय शिंदे
अकोट, दि. 1 - अकोला जिल्ह्यातील अकोट येथे संत वासुदेव महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीक्षेत्र श्रद्धासागरात गुरूभक्तीचा मेळा फुलला आहे. राज्यभरातून लाखो भाविकभक्त व पालखी भजनी दिंडीने अवघी अवतरली पंढरी असे श्रद्धा, भक्ती व ज्ञानाचा संगम पाहावयास मिळत आहे.
संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांचे नातू वारकरीरत्न संत वासुदेव महाराज यांचा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. गुरूमाऊली रथाची निवासस्थानापासून शेकडो भजनी दिंडीसह शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
ठिकठिकाणी रांगोळी, स्वागत रामकृष्ण 'हरि ओम वासुदेव नमो नमः'च्या गजराने शहर भक्तिरसात वाहुन गेले. भजनदिंडी स्पर्धामुळे राज्यातून भजनीमंडळी आली होती. श्रद्धासागर येथे आळंदीचे हभप विठ्ठल महाराज कोरडे यांचे काल्याचे किर्तन पार पडले.
मंदिरावर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी केल्यानंतर गुरूमाऊली वासुदेव महाराज यांची महाआरती करण्यात आली. या ठिकाणी गत सात दिवसापासून सुरू असलेल्या रामाणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामायणाची सांगता तसेच प्रवचन, किर्तन पार पडली. मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. लाखो भक्तांनी हा परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थाचे संस्थापक अध्यक्ष वै. पंजाबराव हिगंणकर याचे पुण्यस्मरण असल्याने त्यानाही अभिवादन करण्यात आले.