- प्रवीण खेते
अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या विविध आजारांचे निदान करून त्यावर उपचार केले जातात. मात्र, आता डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर (डीआयसी)मार्फत जन्मत:च शिशूंमधील दोषांचे निदान केले जात आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील तीन नवजात शिशूंमध्ये कर्णबधिरतेचा दोष आढळून आला असून, तीन महिन्यांत त्यांची पुढील चाचणी केली जाणार आहे. राज्यातील सर्वच डीआयसीमध्ये हा उपक्रम राबविण्याचे निर्देश असले, तरी लॉकडाऊनमुळे बहुतांश डीआयसी असूनही बंद असल्याची माहिती आहे. बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. शाळा बंद असल्याने आरबीएसकेअंतर्गत बालकांची वैद्यकीय तपासणी झाली नाही. दरम्यान, डिसेंबरपासून राज्यभरातील ‘डीआयसी’मार्फत नवजात शिशूंमधील जन्मजात दोषांचे निदान करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, अकोल्यातील डीआयसीमार्फत नवजात शिशूंमधील विविध आजारांच्या निदानास सुरुवात करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांत अकोल्यातील ३ शिशूंमध्ये जन्मत:च कर्णबधिर असल्याचे निष्पन्न झाले. या बालकांच्या प्राथमिक तपासणीनंतर आता त्यांची ‘बेरा’ तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये दोष आढळून आल्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या तपासण्या केल्या जातात
कानाची तपासणी
डोळ्यांची तपासणी
हृदयाची तपासणी
रिक्त पदांमुळे अनेक ठिकाणी तपासणी नाही
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘डीआयसी’ची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश डीआयसीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवजात शिशूंमधील जन्मजात असलेल्या दोषांचे निदान करणे शक्य नाही. याशिवाय, गतिमंद मुलांचे उपचारही अशा ठिकाणी होत नसल्याची माहिती आहे.
काय आहे जिल्ह्याची स्थिती
सहा महिन्यांत तपासणी झालेले शिशू- १५७३
निदान झालेले रुग्ण - ३ (कर्णबधिर)
या रुग्णांवरही उपचार सुरू
डीआयसीमार्फत मुलांमध्ये जन्मजात असलेल्या दोषांचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात हे उपचारदेखील खंडित झाले होते. मात्र, आता डीआयसी पूर्ववत सुरू झाल्याने ऑटिझम, हेअरिंग लॉस, फिजिओथेरपी आदी उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत दररोज दहा रुग्णांवर उपचार सुरू असतात.
डीआयसीमार्फत नवजात शिशूंमधील जन्मजात दोषांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत तीन शिशूंना कर्णबधिरतेची समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची पुन्हा एकदा ‘ओएई’ ही प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर ‘बेरा’ तपासणी केली जाणार असून, त्यात दोष आढळल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डिसेंबरपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला