चिखली (जि.बुलडाणा) : जावई असल्याने सासरवाडीत केवळ आपलेच लाड पुरविले जावेत या मानसिकतेतून आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय मेव्हण्याचा गळा आवळून खून करणार्या गजानन नारायण गुंजाळ याला बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी जन्मठेप व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.२0 मार्च २0१४ ला मध्यरात्रीच्या सुमारास सवणा येथील समाधान नामदेव साजरे यांचा मुलगा गजानन साजरे (५) हा आईच्या कुशीत झोपलेला असताना त्यास उचलून नेवून त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर घरामागे त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर मृताच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीवरून सवणा येथीलच प्रल्हाद नारायण खडके यांना अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील खरा आरोपी दुसराच असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यानुषंगाने तपासाची दिशा ठरवत सवणा येथे तळ ठोकला होता. दरम्यान तपास अधिकारी व कर्मचार्यांनी अत्यंत शिताफीने मृतक मुलाच्या कुटूंबियांची मानसिकता सांभाळून मृतक मुलाचा मेव्हणा गजानन गुंजाळ यास अटक करून बोलते केले. त्यावेळी त्याने सासरी मिळत असलेली दुय्यम वागणूक व सासर्याच्या मालमत्तेवर डोळा ठेवून गजाननचा खून केल्याची कबूली दिली.याप्रकरणी गुन्हय़ाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयामध्ये आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयामध्ये सरकार पक्षाकडून आरोपीविरूध्द एकूण ९ पुरावे तपासण्यात आले. आरोपी गजानन गुंजाळ यास १८ डिसेंबर रोजी वि.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जोशी यांनी जन्मठेप व २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
मेव्हण्याचा खून करणा-यास जन्मठेप
By admin | Published: December 19, 2014 1:08 AM